पतंग व्यवसायावर ‘संक्रांत’ येताच थेट एमडी ड्रग्जची विक्री; गुन्हे शाखेच्या सापळ्यात तस्कराच्या आवळल्या मुसक्या

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : पोलिसांच्या कडक कारवाईमुळे नायलॉन मांजाची अवैध विक्री बंद होऊन पतंग व्यवसायावर ‘संक्रांत’ आल्याने, एका पतंग विक्रेत्याने थेट ड्रग्ज तस्करीचा मार्ग निवडल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र, त्याच्या या काळ्या धंद्याचाही पोलिसांनी पर्दाफाश केला असून, बुढीलेन भागात सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. एनडीपीएस पथकाने १७ नोव्हेंबर रोजी केलेल्या या कारवाईत आरोपीकडून ३१.६५ ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि नशेच्या ९० बटन गोळ्या असा एकूण २ लाख १० हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अनिल गुलाबसिंग सूर्यवंशी (५३, रा. लोधेश्वर महादेव मंदिराजवळ, बुढीलेन) असे आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. बुढीलेन भागात एक व्यक्ती दुचाकीवरून ड्रग्जची विक्री करत असल्याची माहिती एनडीपीएस पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन जाधव यांना मिळाली. त्यानुसार, उपनिरीक्षक उत्रेश्वर मुंडे, अंमलदार नारायण पायघन, भावसिंग चव्हाण, सतिष जाधव, विशाल मेटे, नितेश सुंदर्डे, सरताज पठाण, विठ्ठल पवार, औषधी निरीक्षक मनोज पैठणे आणि रासायनिक विश्लेषक प्रीती क्षिरसागर यांच्या पथकाने लोधेश्वर महादेव मंदिराजवळील प्रकाश मांजा दुकानासमोर सापळा रचून अनिलला ताब्यात घेतले. अंगझडतीत त्याच्याकडे ९४ हजार ९५० रुपयांची ३१.६५ ग्रॅम एमडी पावडर, ३६ हजार रुपयांच्या नायट्राझेपाम १० या नशेच्या ९० बटन मेकर गोळ्या, मोबाइल आणि स्कूटी (एमएच २०, ईएम ७८६२) मिळून आली.
थेट दुकानातून ड्रग्ज तस्करी
आरोपी अनिल सूर्यवंशी याचा पतंग आणि मांजा विक्रीचा पारंपरिक व्यवसाय होता. मात्र, उच्च न्यायालयाच्या कडक इशार्‍यानंतर पोलिसांनी मांजाविरुद्ध मोहीम उघडली. त्यामुळे मांजाची अवैध विक्री बंद झाली. त्यामुळे पतंग विक्रीच्या व्यवसायावर संक्रांत आली. त्यामुळे अनिल हा ड्रग्ज तस्करीकडे वळला. थेट दुकानातून ड्रग्ज तस्करी सुरु केल्यास लवकर पकडले जाऊ, या भीतीमुळे त्याने स्कूटीवरून थेट होम डिलिव्हरी द्यायला सुरुवात केली होती.